

Jintur Farm Fire News
जिंतूर : जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथे सोमवारी (दि.११) दुपारी भीषण आग लागून महिला शेतकरी संगीता संजय राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गट क्रमांक १२७ मधील त्यांच्या शेतातील आखाड्याला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली.
आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण करत शेतातील तीन स्प्रिंकलर सेट पूर्णपणे जळून खाक केले. तसेच आंबा व नारळाची काही झाडेदेखील आगीत भस्मसात झाली.आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या आगीत अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेमुळे संगीता राठोड यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असून परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.