

पूर्णा : रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टिप्परवर बुधवारी (दि.१५) सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई पुर्णा शहरानजीक असलेल्या कानडखेड फाटा येथे सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली. टिप्पर (क्र. एम.एच. २४ एफ ७२६२) या ६ हजार रुपये किंमतीची वाळू व टिप्पर असा ४ लाख ६ हजाराचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त केला.
पुर्णा पोलिस ठाण्यातील पोलीस शिपाई पांडुरंग वाघ यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक अकाश गोडबोले, मालक विष्णू जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभाग पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचारी पोलिस शिपाई पांडुरंग वाघ, पोलिस शिपाई राठोड यांनी केली. पुढील तपास पोनि विलास गोबाडे करीत आहे.