

परभणी : शहरात नवरात्रोत्सवानिमित्त विक्रीसाठी आणलेल्या देवीच्या मूर्तींना रविवारी रात्री साडेआठ वाजेनंतर झालेल्या धुवाधार पावसाचा फटका बसला. गांधी पार्क परिसरात स्टॉल लावून विक्रीसाठी ठेवलेल्या आकर्षक मूर्ती पावसाने भिजल्या असून, यामुळे स्थानिक मूर्तीकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नवरात्र उत्सव सोमवारपासून सुरु होत आहे. यातच सजावट आणि मूर्तींची विक्री सुरू होती. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने विक्रेत्यांची धांदल उडाली. जवळपास अर्धा ते पाऊण तास पडलेल्या जोरदार पावसामुळे गांधी पार्क शेजारील रस्त्यावर पाणी साचले. याच ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या देवीच्या मूर्ती पाण्यात भिजल्या.
कारागीरांनी मेहनतीने तयार केलेल्या विविध रूपातील देवीच्या मूर्ती पावसामुळे खराब झाल्याने विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही मूर्तींच्या रंगसंगतीवर परिणाम झाला असून, काही मूर्ती पूर्णपणे खराब झाल्या आहेत. यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.