

मानवत, पुढारी वृत्तसेवा : मानवत तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ नुकसान भरपाई जमा करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी (दि. ६) दुपारी धरणे आंदोलन करून तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला. Parbhani News |
मानवत तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मानवतरोड येथे रास्तारोको आंदोलन केले होते. यावेळी मानवत तहसीलदारांनी एक महिन्यात नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन आंदोलक शेतकऱ्यांना दिले होते. परंतु, अतिवृष्टी होऊन महिने उलटल्या नंतर ही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. कापूस, सोयाबीन तुरीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यात यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शेतकरी सुकाणू समितीचे लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे, गोविंद घांडगे, बाबासाहेब अवचार, सुरज काकडे, लक्ष्मण शिंदे, हनुमान मस्के, राम शिंदे, बालासाहेब मसलकर, दत्तराव शिंदे, ज्ञानोबा मुळे आदीसह शेतकरी सामील झाले होते.