

पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : शहराजवळील पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावरील शेतशिवारात आज (दि. २५) चरायला सोडलेल्या शेळ्यांवर अज्ञात रानटी हिंस्र प्राण्याने हल्ला केला. यामध्ये शेळ्यांच्या पिल्लांचा चावा घेत फडशा पाडला.
यासबंधी अधिक माहिती असी की,पूर्णा येथील शेतकरी देवा भय्या उर्फ किशोर रामराव कदम यांची पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावर पूर्णा शिवारात थुना नदी शेजारी जमीन आहे. त्यांनी आपल्या शेतात रान खतवण्यासाठी नामदेव हिवरे यांनी जवळपास २५ शेळ्या बसवल्या होत्या. शेळीपालकाने काही शेळी पिल्ले एका मोठ्या डालग्यात कोंडून ठेवून बाकीच्या काही शेळ्या चारायला घेवून नेलेल्या होत्या. चारुन परत आल्यानंतर डालगे तोडून उघडून कोणीतरी रानटी हिंस्र प्राण्याने शेळ्यांवर हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडल्याचे आढळून आले. यामध्ये एकूण बारा शेळ्या मृत्युमुखी पडून सदर पशूपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, घटनेची माहीती दिल्यावरुन परभणीचे वनपाल कंदहारे के एन व वनरक्षक शेख हे येवून त्यांनी पंचनामा केला. रानटी हिंस्र प्राण्याच्या हल्यात शेळ्यांचा फडशा पाडल्यामुळे इतर शेळीपालक, पशूधन पालक शेतक-यातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर हल्ला हा लांडगे किंवा कोल्ह्याने केल्याचा कयास वर्तवण्यात येत आहे. त्याच बरोबर या परिसरातील शेतक-यांनी आपल्या पशूप्राण्याचे चोख सरंक्षण करावे असे अवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.