

सोनपेठ ( परभणी / हिंगोली) : येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे ३७ वर्षांची परंपरा राखत शारदीय नवरात्रोत्सवाला बुधवारी (दि.२२) विधिवत घटस्थापनेने सुरुवात झाली. यावेळी दत्तराव कदम यांनी सपत्नीक देवीची पूजा करून उत्सवाचे औपचारिक उद्घाटन केले.
नवरात्रोत्सव हा देवीच्या नऊ रूपांची उपासना आणि भक्तीचा पर्वकाळ मानला जातो. शक्ती साधना, आत्मशुध्दी आणि धार्मिक उत्साह या सर्वांचा संगम असलेला हा सण संपूर्ण तालुक्यात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. सोनपेठमधील या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या ३७ वर्षांपासून मूळ मूर्तीच पूजेसाठी वापरली जाते. आजही पूर्वीच्या परंपरेप्रमाणे घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा देवीच्या स्थापनेसाठी गडकोट शैलीतील आकर्षक सजावट करण्यात आली. उत्सव काळात सर्व सेवेकरी उपवासाचे कठोर पालन करत फक्त ताक, दही, दूध व फराळाचे अन्न सेवन करतात. दसऱ्याला शहरातील मुख्य रस्त्यांवरून देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तालुक्यातील अनेक भक्तांनी येथे नवस केले असून नवस फळल्यावर तो येथे येऊन पूर्ण केला जातो. त्यामुळे या देवीच्या दर्शनाला आणि सेवा-पूजेसाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होताना दिसत आहे.
बोरी : येथील जगदंबा देवी मंदिरात (सुताराची आई) नवरात्रोत्सव भक्तांच्या प्रचंड गर्दीत, भक्तिभावाने आणि भव्यतेने साजरा होत आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवात दररोज देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडत असून मंदिर परिसर रंगरंगोटी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने न्हालेला आहे. मंदिरातील २२ फूट उंच दीपमाळ विशेष आकर्षण ठरत असून, रात्रीच्या आरतीवेळी दीपमाळीतील प्रकाश मंदिर परिसरात दिव्यता निर्माण करतो.
देवीचे हे स्थान माहूरच्या रेणुका माता आणि राणीसावरगावच्या जगदंबा देवीचे उपठाण मानले जाते. येथील पूजेची पारंपरिक जबाबदारी झिंगरे कुटुंबीयांकडे असून यंदा पूजारी म्हणून गोपाळ झिंगरे हे पूजा करीत आहेत. घटस्थापना व होम-हवनाचा मान अनंतराव चौधरी यांच्याकडे आहे. प्रत्येक दिवशी सायंकाळी ७वाजता संबळ टाळांच्या गजरात देवीची आरती उत्साहात पार पडते. आरतीनंतर प्रसाद वाटप, देवी महात्म्याचे वाचन व कीर्तन होत आहेत. नवरात्रातील अंतिम दिवशी दसऱ्याला जगदंबा देवीची पालखी मिरवणूक गावात ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात येते. मिरवणुकीत गावातील नागरिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतात. पालखी परतल्यानंतर देवीची महाआरती व महाप्रसाद वाटप होतो. दुसऱ्या दिवशी गोप-ाळकाल्याचा महाप्रसाद होतो. नवरात्र उत्सवामुळे बोरी व परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण परिसर जागृत देवस्थानाच्या साक्षीने एकत्र येत नवरात्र साजरी करत आहे.