

गंगाखेड : भाजी मार्केट स्थलांतर करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात व्यापाऱ्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची घटना गंगाखेड शहरातील भाजी मार्केट परिसरात ११ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेनंतर छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या व्यापाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात चार ते पाच महिला-पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत व्यापारी सुनील भरत घरजाळे (वय ३७, व्यवसाय—मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद बालाजी नागरगोजे यांनी गंगाखेड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, सुनील घरजाळे यांचे जुना भाजी मार्केट परिसरात इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून, भाजी मार्केट स्थलांतरित करण्याबाबत काही दिवसांपासून वाद सुरू होता. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान चार ते पाच भाजी विक्रेते महिला व पुरुषांनी सुनील घरजाळे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर सकाळी सुमारे १०.३० वाजता भाजी मार्केट परिसरात पुन्हा वाद झाला. यावेळी संबंधितांनी घरजाळे यांच्या दुकानासमोर येऊन शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सुनील घरजाळे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे गंगाखेड शहरातील भाजी मार्केट स्थलांतराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्यापारी महासंघाने यापूर्वीही अनधिकृत भाजी मार्केट हटविण्याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे निवेदने दिली होती. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
गंगाखेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), ३५२, ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक धन्यदेव प्रल्हाद सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण तसेच घटनेतील आरोपींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद, सलग दोन दिवस बाजारपेठ ठप्प
भाजी मार्केट स्थलांतराच्या वादातून व्यापारी सुनील घरजाळे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवार आणि शनिवार असे सलग दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवून तीव्र निषेध नोंदविला. व्यापाऱ्यांच्या या बंदला शहरातील विविध व्यापारी संघटनांचा प्रतिसाद मिळाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.
भाजी मार्केट स्थलांतराचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, यावरून निर्माण झालेल्या वादात व्यापाऱ्याला धमकी व मारहाण झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याने व्यापारी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, भाजी मार्केटचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.सलग दोन दिवस व्यापार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात रोष व्यक्त केला. या घटनेमुळे गंगाखेडमधील भाजी मार्केट स्थलांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.