परभणी : असोल्यात तरूणावर गोळीबार; संतप्त जमावाची हल्लेखोराच्या घरावर दगडफेक, वाहने जाळली

परिसरात तणाव; पोलिस बंदोबस्त वाढविला
 Asola village Firing
असोला गावात तरूणावर गोळीबार झालाFile Photo

हट्टा : औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी (दि.१८) रात्री सातच्या सुमारास घडली. या गोळाबारात मारूती विश्‍वनाथ पावडे या तरूण गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर दगडफेक करून दुचाकी जाळली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

असोला येथे गुरुवारी रात्री गावातील दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी मारूती पावडे हे गेले होते. यावेळी बालाजी नागरे या तरुणाने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये मारूती यांच्या पोटाला गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांनंतर परिसरातील नागरिकांना त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर संतप्त जमावाने बालाजी याची एक दुचाकी जाळली. त्यानंतर त्याची कारची तोडफोड करून त्यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये त्याचे वडील रमेशराव नागरे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मलपिल्लू, गजानन बोराटे, उपनिरीक्षक प्रसनजीत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली.

असोला येथील संतप्त झालेल्या सुमारे २०० पेक्षा अधिक गावकऱ्यांचा जमाव जवळाबाजार चौकीवर आला. यावेळी असोला पाटीजवळ असलेली दोन ट्रॅक्टरही जमावाने पेटवून दिली आहे. 'आरोपी अटक होत नाही, तो पर्यंत येथून हटणार नाही' अशी भूमिका जमावाने घेतली आहे. त्यानंतर पोलिसांनी बालाजी याला ताब्यात घेतले.

असोला गावात तनावाचे वातावरण

जवळाबाजार व असोला येथे स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. सध्या गावात तणावाचे वातावरण आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये तसेच शांतता राखण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news