

परभणी : जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतातील पाण्याच्या विद्युत मोटारी चोरणार्या एका टोळीस स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा लावून मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.
पांडू गुलाब काळे (रा. मंगरुळ ता. मानवत), श्रावण अण्णा काळे (रा. तामसवाडी ता.जि.परभणी) हे विद्युत मोटारी चोरणारे दोघा आरोपींच्या ठिकाणाची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शााखेच्या पथकाने शनिवारी (दि.१५) सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील माहितीच्या आधारे संतोष सचिन पवार (रा.मंगरुळ) यास एका आखाड्यावरुन ताब्यात घेतले. या तीनही आरोपींकडून पोलिसांना मानवत, दैठणा, गंगाखेड या परिसरात शेतकर्यांच्या विद्युत मोटारी लंपास केल्याची बाब समोर आली. यातील चार गुन्हे तात्काळ उघडकीस आले. विद्युत मोटार, वायर, स्टार्टर चोरणारा आरोपी विशाल अंबरसिंग ठाकूर यासही भंगाराच्या भावात मुद्देमाल विकल्याची माहिती आरोपींकडून मिळाली आहे. पोलिसांनी एकूण ३५ हजार रोख व त्या आरोपीलाही ताब्यात घेतले.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सपोनि राजीव मुत्तेपोड, पोउपनि अजित बिरादार, गोपिनाथ वाघमारे, चंदन परिहार, अंमलदार मधुकर चट्टे, हनमंत जक्केवाड, निलेश भूजबळ, सुग्रीव केंद्रे, जमीर फारोखी, रवि जाधव, हुसेल पठाण, मधुकर ढवळे, संजय घुगे यांच्या पथकाने केली.