

marathwada drought crisis परभणी : पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेल्या केळीच्या बागेवर अखेर शेतकऱ्याला जेसीबी फिरवावा लागला. पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याअभावी चार एकरांतील केळीची बाग डोळ्यांदेखत वाळून गेली. बाग वाचविण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने ब्राह्मणगाव शिवारातील शेतकरी उत्तम गाडगे यांनी अखेर शुक्रवारी उभी बाग जमीनदोस्त केली. या घटनेने दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांची हतबलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
उत्तम गाडगे यांनी ब्राह्मणगाव शिवारात चार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली होती. केळीच्या उत्पादनातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल, या आशेने त्यांनी बागेवर मोठा खर्च केला. एकरी ७० ते ८० हजार रुपये याप्रमाणे ४ एकरांसाठी सुमारे २ लाख ८० हजार ते ३ लाख २० हजारांची गुंतवणूक केली होती.
मात्र, पावसाने दडी मारल्याने बागेला पुरेसे पाणी मिळू शकले नाही. पाण्याचा ताण वाढत गेल्याने हिरवीगार केळीची झाडे करपू लागली. बाग वाळत चालल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या आशाही मावळल्या. बाग जगविण्यासाठी गाडगे यांनी विविध प्रयत्न केले, मात्र पाण्याअभावी त्यांना यश आले नाही. डोळ्यांदेखत कष्टाने जोपासलेली बाग उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली. अखेर नाईलाजास्तव जेसीबीच्या साहाय्याने ४ एकरांतील केळीची बाग काढून टाकण्यात आली. त्यामुळे लाखोंची गुंतवणूक वाया गेली असून, अपेक्षित उत्पादनही हातातून गेले आहे. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली अग्रीम मदत अद्याप मिळाली नसल्याचा आरोप गाडगे यांनी केला आहे.
एकीकडे पिकांचे नुकसान, दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीचा फटका आणि त्यातच शासकीय मदतीची प्रतीक्षा, अशा तिहेरी संकटात ते सापडले. हिरवीगार बाग उभी करण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्यावर केलेली लाखोंची गुंतवणूक क्षणात मातीमोल झाली. स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांवर स्वतःलाच जेसीबी फिरवावा लागणे, ही दुष्काळाने शेतकऱ्यांवर ओढवलेली विदारक वेळ आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.