

मानवत : ऐन खरीप हंगामाच्या उंबरठ्यावरच तालुक्यात इंधन टंचाईने भीषण स्वरूप धारण केले असून, वाहनधारक, शेतकरी आणि सामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलसाठी ठिकठिकाणी लांबच लांब रांगा लागत असून, अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.२३) दुपारी १२ वाजता तालुक्यातील रूढी पाटी शिवारातील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या क्रमांकावरून वाहनधारकांमध्ये सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच उफाळून येत दोन गटांतील तुफान हाणामारीत परिवर्तित झाला.
रांगेत उभ्या असलेल्या वाहनधारकांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर संताप अनावर झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. अचानक झालेल्या या राड्यामुळे पंप परिसरात गोंधळ, आरडाओरडा आणि धावपळ निर्माण झाली. काही वेळासाठी संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या शहरासह ग्रामीण भागातही इंधनाचा तुटवडा जाणवत असून, शेतकरी वर्ग सर्वाधिक प्रभावित झाला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर, शेतीपंप, वाहतूक यासाठी डिझेल अत्यावश्यक असताना पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या असून, अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. या असंतोषजनक परिस्थितीमुळे वारंवार किरकोळ वाद निर्माण होत असून, काही ठिकाणी ते थेट हाणामारीपर्यंत पोहोचत आहेत. रूढी पाटी शिवारातील पेट्रोल पंपावर दुपारच्या सुमारास वाहनधारकांच्या क्रमांकावरून दोन गटांमध्ये झालेला वाद इतका तीव्र झाला की त्याचे रूपांतर थेट मारहाणीमध्ये झाले.
काही जणांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र काही काळासाठी वातावरण पूर्णपणे बिघडले होते. घटनेनंतर मानवत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. इंधन टंचाईसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः खरीप हंगामाच्या काळात निर्माण झालेली ही परिस्थिती प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.