

परभणी : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आ. रामप्रसाद कदम-बोर्डीकर तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील-गोरेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी (दि.३) सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी भवन सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची सभा अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी. काकडे यांच्या अध्यक्षेत पार पडली.
अध्यक्षपदासाठी माजी आ. रामप्रसाद कदम-बोर्डीकर व भावना सचिन मुंगसे-बोर्डीकर असे पिता-पुत्रीचे दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी भावना सचिन मुंगसे-बोर्डीकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने माजी आ. रामप्रसाद कदम-बोर्डीकर यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. तर उपाध्यक्ष पदासाठी आ. सईद खान व राजेश पाटील गोरेगावकर असे २ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
आ. सईद खान यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने राजेश पाटील-गोरेगावकर यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. ही अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी. काकडे यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
यशस्वीतेसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एम.यू. यादव व बी.एस. नांदापूरकर तसेच निवडणूक कक्षातील सचिन लोणीकर, डी.जी. पठाण व गोविंद कदम यांनी निवड कामकाजात मदत केली.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी. काकडे यांनी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आ. रामप्रसाद कदम-बोर्डीकर यांचा व उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला. यावेळी बँकेची मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. कुरुंदकर तसेच बँकेचे अधिकारी माळवटकर हे उपस्थित होते.