Parbhani Crime : परभणी एसटी डेपोत खळबळ! सुरक्षा रक्षकाकडूनच ७० किलो भंगार चोरीचा प्रयत्न, पोलिसांत गुन्हा दाखल

Parbhani Crime : परभणी एसटी डेपोत खळबळ! सुरक्षा रक्षकाकडूनच ७० किलो भंगार चोरीचा प्रयत्न, पोलिसांत गुन्हा दाखल
Published on
Updated on

परभणी : येथील गंगाखेड रोडवरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय कार्यशाळेतून लोखंडी भंगार साहित्य चोरून बाहेर नेण्याचा प्रयत्न सुरक्षा तपासणी दरम्यान उघडकीस आला आहे. या प्रकरणी मेस्को कंपनीच्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे एसटी कार्यशाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत विभागीय कार्यशाळेतील यंत्र अभियंता मंगेश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते १६ डिसेंबर २०२४ पासून एसटी विभागीय कार्यशाळेत कार्यरत आहेत. शुक्रवारी (दि. ३) सकाळी सुमारे ८ वाजून ४० मिनिटांनी कर्मचाऱ्यांची नियमित सुरक्षा तपासणी सुरू होती. त्या वेळी मेस्को कंपनीचा सुरक्षा रक्षक महेश प्रेमचंद राठोड (वय २५, रा. प्रेमचंद निवास, वसमत रोड, वसंतराव नगर, परभणी) याची अंगझडती, बॅग तसेच स्कूटीची तपासणी करण्यात आली.

या तपासणी दरम्यान राठोडच्या बॅगमध्ये आणि स्कूटीच्या डिकीत एसटी कार्यशाळेतील स्प्रिंग ब्रॅकेट, प्लेटचे तुकडे, फ्रंट ब्रेक कॅम, आर्म बोल्ट, पिन, गुटका तसेच इतर लोखंडी भंगार साहित्य आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या या साहित्याचे एकूण वजन सुमारे ७० किलो असून, त्याची अंदाजे किंमत २ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर साहित्य एसटी कार्यशाळेच्या मालकीचे असून ते कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी मंगेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात महेश प्रेमचंद राठोड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत. दरम्यान, कार्यशाळेतील भंगार साहित्याची सुरक्षा, देखरेख आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी एसटी प्रशासन आता कोणती कडक उपाययोजना करणार, याकडे कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news