

मानवत : मानवत पोलिसांनी रामपुरी रोडवर सोमवारी (दि. ९) रात्री सापळा रचून अवैध दारू तस्करांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. व्हीआयपी स्टाईलने 'स्विफ्ट डिझायर' कारमधून चाललेली देशी दारूची मोठी चोरटी वाहतूक पोलिसांनी हाणून पाडली. या धडक कारवाईत पोलिसांनी कारसह तब्बल ४ लाख १९ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तेलंगणा राज्यातील दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पथक क्रमांक २ चे पोलीस हवालदार शेख असलम इस्माईल शेख यांना रामपुरी रोडवरून मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रात्री सुमारे ८.५० वाजता सापळा रचला. संशयित एमएच-०३ बीसी-६५२६ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार अडवून तिची झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह दारूचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. चौकशीत आरोपींनी दारू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे बैले नितीन रविंद्र (वय २४) व विजयकुमार देवेंद्रे पंपरी (वय २१) अशी असून ते दोघेही तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
मानवत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
तीन लाखाच्या कारसह एक लाख एकोणीस हजार तीनशे साठ रूपयांचा देशी विदेशी दारूंचा साठा यावेळी पोलिसांनी जप्त केला. असा एकूण ४ लाख १९ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.