Parbhani crime | शेतीच्या वादातून डोळ्यात चटणी टाकून माय लेकांना बेदम मारहाण
पूर्णा: तालुक्यातील आहेरवाडी शिवारात शेतीचा वाद विकोपाला गेला आहे. या वादातून भावकितील काही लोकांनी माय-लेकावर भ्याड हल्ला केला आहे. शेतात कापूस वेचताना डोळ्यात चटणी टाकून दोघांनाही बेदम मारहाण केली. यामध्ये ६५ वर्षीय वृद्ध महिला आणि तरुण मुलगा जखमी झाले.
ही घटना १४ डिसेंबर रोजी घडल्याने लाठ्या-काठ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालूक्यातील आहेरवाडी येथील महिला शेतकरी धुरपताबाई लक्ष्मण खंदारे (वय-६५ वर्ष) व मुलगा गौतम हे दि.१४ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतात कापूस वेचणी करत होते. इतक्यात तिथे भावकीतील नामदेव खंदारे, माधव खंदारे, शांताबाई खंदारे, ज्योती खंदारे हे त्यांच्याजवळ आले. म्हणाले की, तुम्ही या शेतात कशाला आले हे शेत आमचे आहे. तेव्हा त्यांना फिर्यादी धुरपताबाई म्हणाल्या की, हे शेत आम्ही माझा मोठा भाया सहादू खंदारे यांच्याकडून घेतले आहे. असे म्हणताच माधव खंदारे याने शिवीगाळ करून लाकडाने डोक्यात मारहाण करून जखमी केले. तसेच मुलगा गौतम यास नामदेव खंदारे यांनी हातावर काठीने मारहाण केली. तसेच एकाने डोळ्यात चटणी टाकून घायाळ केले. शिवाय एका महिलेने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. सदर घटनाप्रकरणी पुढील तपास पो. नि. विलास गोबाडे करत आहेत.

