

मानवत : शहरातील मुख्य रस्त्यावर चोरट्याने एकाच पहाटे तीन ठिकाणी चोऱ्या केल्याची घटना घडली. सुनील ढमढेरे यांच्या मालकीच्या कापड दुकानाचे टाळे तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. दुकानातील तिजोरी फोडून रोकड लंपास करण्यासाठी त्याने बराच वेळ प्रयत्न केला. मात्र, शर्थीचे प्रयत्न करूनही तिजोरी न फुटल्याने चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. तिजोरीतील रोकड आणि दुकानातील अन्य साहित्य सुरक्षित राहिल्याने येथे मोठी चोरी टळली.
कापड दुकानातील प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर चोरट्याने 'राज टेलर' या टेलरिंग दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. मात्र, तेथेही त्याच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर चोरट्याने ग्रामीण रुग्णालयाजवळील एका हॉटेलला लक्ष्य केले. हॉटेलचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत त्याने १२ ते १३ हजार रुपयांची रोकड तसेच शीतपेयाच्या बाटल्या लंपास केल्या. त्यामुळे दोन ठिकाणी चोरट्याचे प्रयत्न निष्फळ ठरले असले, तरी तिसऱ्या ठिकाणी मात्र चोरी करण्यात तो यशस्वी झाला.
या घटनेतील चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असल्याची माहिती आहे. एकाच पहाटे शहरातील मुख्य रस्त्यावरील तीन ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याने व्यापारी वर्गात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुकानांचे टाळे आणि शटर तोडून चोरट्याने केलेल्या या धाडसामुळे रात्रीच्या पोलीस गस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कापड दुकानातील तिजोरी न फुटल्याने मोठी हानी टळली; मात्र हॉटेलमधून रोकड चोरीला गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा तातडीने शोध घ्यावा आणि शहरातील रात्रीची गस्त अधिक प्रभावी करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.