

मानवत : मानवत तालुक्यातील लोहरा येथे बुधवारी (ता. १३) सकाळी घडलेल्या अपहरणाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दूध आणण्यासाठी गेलेल्या एका युवकास पाच जणांनी मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये टाकून पळवून नेले. मात्र, मानवत पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या हालचालींमुळे काही तासांतच आरोपींना पकडण्यात यश आले असून अपहरण झालेल्या युवकाची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहरा येथील दत्तात्रय अमृतराव जाधव हे बुधवारी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान पोहंडूळ रोडवरील दूध डेअरीवर दूध आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी विठ्ठल भारतराव जाधव (रा. लोहरा), ओंकार बाबाराव कदम (रा. रामेटाकळी), कुलदीप निर्मळ (रा. खरबा, ता. मानवत), मोहन नानाभाऊ खिस्ते (रा. राजुरा, ता. सेलू) आणि दत्ता पांडुरंग खुडे (रा. खेर्डा, ता. पाथरी) या पाच जणांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने ग्रे रंगाच्या कारमध्ये टाकून त्यांचे अपहरण केले.
ही संपूर्ण घटना शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या एका मुलाने पाहिली. त्याने गावात धाव घेऊन ही माहिती दिल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.
अशी झाली कारवाई...
घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. त्यांनी पोलीस कर्मचारी फैयाज सय्यद यांना आरोपी आणि अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मोबाईल लोकेशनची माहिती पाठवून शोधमोहीम सुरू करण्याचे आदेश दिले.
फैयाज सय्यद यांच्यासह उमर सय्यद, अनिस कौसडीकर आणि शक्तीराज नैताम यांनी लोकेशनच्या दिशेने पाठलाग सुरू केला. मोबाईलचे लोकेशन प्रथम बोरी परिसरात आढळून आले. त्यानंतर लोकेशन पुढे सरकत असल्याचे दिसताच मानवत पोलिसांनी जिंतूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून चारठाणा येथे तातडीने नाकाबंदी करण्यास सांगितले.
जिंतूर पोलिसांनी चारठाणा येथे नाकाबंदी उभारल्यानंतर पोलीस हवालदार मुजीब शेख, प्रमोद उगवकर, परमेश्वर थोरे आणि आशुतोष माने यांनी संशयित कार अडवून तपासणी केली. यावेळी कारमध्ये अपहरणातील पाचही आरोपी आढळून आले. कारची झडती घेतली असता रक्ताने माखलेला रुमाल आणि मारहाणीसाठी वापरल्याचा संशय असलेला लाकडी स्टंपही जप्त करण्यात आला.
मानवत पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन कारसह मानवत पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, अपहरण झालेल्या दत्तात्रय जाधव यांना आरोपींनी मारहाण करून बोरी येथील एका दवाखान्यात उपचारासाठी सोडून दिल्याची माहिती समोर आली.
या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांची समयसूचकता, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या जलद हालचालींमुळे अवघ्या काही तासांत अपहरणाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश आल्याने पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा माग काढला. बोरी ते चारठाणा असा पाठलाग करत अखेर नाकाबंदीत कार पकडण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञान आणि पोलिसांच्या समन्वयामुळे अपहरणाचा हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला. पोलीस तपासात गुन्हा दाखल झाल्यानंतरच अपहरणामागचे मुख्य कारण स्पष्ट होणार आहे.