

परभणी, पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी रामेश्वर विष्णू पौल यास चार वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती के. एफ. एम. खान यांनी बुधवारी (दि.२०) ही शिक्षा ठोठावली . आरोपी पौल याने यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा केला होता व त्यास तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, सेलू तालुक्यातील डिग्रस पाऊल येथील रामेश्वर याने एका आठ वर्षाच्या मुलीला स्वतःच्या घरात नेऊन तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी सेलू पोलीस ठाण्यात 17 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. फौजदार अशोक जटाळ यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रामेश्वर याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय न्यायालयात न्यायाधीश श्रीमती के. एफ. एम. खान यांच्यासमोर चालला.
सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेच्या साक्ष व इतर कागदपत्रे पुरावा सिद्ध झाल्याने आरोपी रामेश्वर यास चार वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे, अतिरिक्त सरकारी वकील देवयानी सरदेशपांडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सानप, फौजदार सुरेश चव्हाण, महिला पोलीस हवालदार वंदना आदोडे यांनी काम पाहिले.
हेही वाचा