

चारठाणा : चारठाणा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी सन २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेकडून वॉटर फिल्टर देण्यात आला होता. मात्र, हा वॉटर फिल्टर केवळ एक वर्ष सुरू राहिला. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षांपासून हा वॉटर फिल्टर बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी फिल्टरच्या पाण्यापासून वंचित आहेत.
विद्यार्थी-विद्यार्थिनींना फिल्टर केलेले पाणी मिळावे, यासाठी राज्य शासनाने प्रत्येक शाळेत वॉटर फिल्टरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चारठाणा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतही विद्यार्थ्यांनी सुरुवातीला फिल्टरच्या पाण्याचा लाभ घेतला. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून हा वॉटर फिल्टर बंद अवस्थेत आहे.
दरम्यान, त्यानंतर दोन-तीन वेळेस पुन्हा विद्यार्थ्यांसाठी वॉटर फिल्टर आला. मात्र, हा वॉटर फिल्टर गेला कुठे, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी फिल्टर होऊन आलेले पाणी प्यावे, यासाठी शासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असतानाही चारठाणा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत वॉटर फिल्टर बंद अवस्थेत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी सध्या शाळेतील नळाचे पाणी पीत आहेत. एकंदरीत शिक्षण विभाग याकडे का कानाडोळा करीत आहे, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.
दरम्यान, चारठाणा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुविधांच्या प्रश्नावर अभिजीत दिपके हे प्रत्येक शाळेत जाऊन भेट देत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याची पाहणी करण्यासाठी ते प्रत्येक जिल्ह्याच्या शाळेमध्ये जाऊन भेटी देत आहेत. चारठाणा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेलाही अभिजीत दिपके कळत-नकळत अचानक भेट देणार असल्याची गुप्त माहिती पुढे आली आहे. या भेटीदरम्यान अभिजीत दिपके शाळेत आल्यानंतर काय-काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.