

परभणी : देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या पाच मित्रांच्या कारला जिंतूर शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावर भीषण अपघात झाला. बुधवारी (दि.१२) मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत गंगाखेड येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने घटनेला वेगळे वळण मिळाले असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
गंगाखेड येथील पाच मित्र एर्टिगा कार क्र. एमएच १४ केएफ २७९० ने उज्जैन येथे देवदर्शनासाठी जात होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार जिंतूर तालुक्यातील अकोली पुलाजवळ पोहोचली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. सुसाट वेगात असलेली कार पुलाच्या कठड्यावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी चौघांना तपासणीअंती मृत घोषित केले. अपघातात रोहन संजय राठोड (वय २७), कृष्णा गुट्टे (वय २८), बालाजी आश्रोबा आवटे (वय २१) व बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय ३०, सर्व रा. गंगाखेड) यांचा मृत्यू झाला असून गोपाळ गणेश रोकडे (वय २५, रा. गंगाखेड) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, अपघातानंतर वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला, वेग जास्त होता का, की अन्य काही कारण होते याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. जिंतूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. तसेच अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपासही केला जात आहे.