

मानवत : मानवत शहरातील पाळोदी रोड भागात स्ट्रीट लाईट दुरुस्ती करताना नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी ता 27 सकाळी 11:30 च्या सुमारास घडली. प्रदीप रामभाऊ सोनटक्के (वय ३९) रा. नगर पालिका वसाहत असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पालिकेचे सफाई विभाग अधिकारी रावसाहेब दगडू झोडपे (रा. वालीबाचा मळा, मानवत) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप सोनटक्के हे नगर परिषदेच्या स्ट्रीट लाईट विभागात मागील ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी प्रदीप सोनटक्के, सिद्धांत घुगे, लाखनसिंग जुन्नी व दत्ता उन्हाळे या सहकाऱ्यांसह पथदिवे दुरुस्तीचे काम करण्यास गेले होते.
काम सुरू करण्यापूर्वी जुनी रचना कॉलनी डी.पी. बंद करून लाईट दुरुस्तीचे काम सुरू केले होते. पहिल्या दोन पोलवरील काम पूर्ण झाल्यानंतर प्रदीप सोनटक्के तिसऱ्या पोलवर चढून काम करीत असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते खाली पडले. तत्काळ सहकाऱ्यांनी त्यांना एका खाजगी रुग्णालयात , मानवत येथे दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
त्यानंतर मृतदेह ग्रामिण रुग्णालय मानवत येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. रावसाहेब झोडपे यांनी दिलेल्या खबरीनुसार, ही घटना अपघाती असून कोणावरही संशय नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.या नुसार मानवत पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मानवत पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.