Parbhani Accident : कोमात असलेल्या भावाच्या उपचारासाठी पैसे घेऊन निघालेल्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

रायखेडा पाटीजवळ दुर्दैवी घटना; अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, एक गंभीर जखमी
Parbhani Accident : कोमात असलेल्या भावाच्या उपचारासाठी पैसे घेऊन निघालेल्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
Parbhani Accident : कोमात असलेल्या भावाच्या उपचारासाठी पैसे घेऊन निघालेल्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
Published on
Updated on

चारठाणा : कोमात असलेल्या भावाच्या उपचारासाठी पैशांची व्यवस्था करून संभाजीनगरकडे निघालेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जालना रस्त्यावरील रायखेडा पाटीजवळ रविवार (दि.३१) सकाळी ०७:३० च्या सुमारास घडली. या अपघातात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दताड येथील अनिल देवीदास सुर्वे (वय २५) व संकेत दत्ता बेले (वय २५, रा. पुसद) हे दोघे दुचाकीवरून जिंतूरमार्गे संभाजीनगरकडे जात होते. अनिल सुर्वे यांचा भाऊ मागील दीड महिन्यांपासून संभाजीनगर येथील रुग्णालयात कोमात असून त्याच्या उपचारासाठी लागणारे पैसे घेऊन हे दोघे निघाले होते.

दरम्यान, रायखेडा पाटीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर दोघेही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले आढळून आले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख अजीज यांनी तपासणी करून अनिल सुर्वे यांना मृत घोषित केले. तर संकेत बेले यांच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अनिल सुर्वे यांच्या पश्चात पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे. एकीकडे भाऊ कोमात असताना त्याच्या उपचारासाठी धावपळ करणाऱ्या भावाचाच अपघाती मृत्यू झाल्याने दताड गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुर्वे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि मुजाजी दळवे, पोहेका उध्दव माने व हरिभाऊ गायकवाड यांनी घटनास्थळ व रुग्णालयाला भेट दिली. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news