परभणी- पुढारी वृत्तसेवा : हिंदुचा महत्वपूर्ण सण असलेल्या नवरात्रौत्सवात कुल जमाती तंजीमच्या वतीने शुक्रवारी करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनास जिल्हा प्रशासनाने परवनगी देवू नये, हे आंदोलन रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि.१०) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आली. या आंदोलनामुळे हिंदूंच्या सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही विहिपने प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मागील २ महिन्यांपासून संत रामगिरी महाराज तसेच नरसिहानंद महाराज यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचे काम काही विशिष्ट मंडळीकडून केले जात आहे. या मुद्याचे भांडवल करून जिल्ह्यातील कुल जमाती तंजीम या संघटनेच्या वतीने जाणीवपूर्वक नवरात्रौत्सवात बाधा आणण्यासाठी शुक्रवारी धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. नवरात्रौत्सवाच्या कालखंडात हिंदू माता भगिनी हे आनंदोत्सव साजरा करत असतात. त्यामुळे या सणाला जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रकार या आंदोलनाच्या माध्यमातून होणार असल्याची शंका परिषदेने व्यक्त करीत ते रद्द करण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी केली, तसेच शहरातील एका मटन विक्रेत्याने बकरे कापून त्याचे रक्त रस्त्यावर टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंदू महिला दर्शनासाठी जात असताना हा प्रकार उघडकीस आला असून अशा दुकानदारावर भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही विश्व
हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली. यावेळी परिषदेचे अनंत पांडे, डॉ. केदार खटींग, मनोजकुमार काबरा, कमलकिशोर अग्रवाल, संजय रिझवानी, प्रल्हाद कानडे, अभिजीत आष्टुरकर, राजन मानकेश्वर, अॅड. अमोल देशमुख, रेणुका मोगरकर, डॉ. जयश्री कालानी, सुनिता तालखेडकर आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.