गंगाखेड : शहरापासून परभणी राष्ट्रीय महामार्गावरील ७ किमी अंतरावरील दुसलगाव पाटी परिसरात आयशर व स्कूलबसचा अपघात झाला. यात स्कूलबस चालक तथा जय भगवान महासंघ संघटना जिल्हाध्यक्षाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी (दि.११) दुपारी २:३० वाजता घडली. जनार्धन शेषराव आंधळे (रा. झोला ता. गंगाखेड) असे अपघातात मयत झालेल्या स्कूलबसचालकाचे नाव आहे. गंगाखेडहून परभणीकडे जाणाऱ्या ७ किमी अंतरावरील दुसलगाव पाटी परिसरात शुक्रवारी दुपारी २:३० वाजता परभणीकडे जाणाऱ्या आयशर क्रमांक एमएच ०४-३५९७ व परभणीहून गंगाखेडकडे येत असलेल्या स्कूलबस क्रमांक एम एच ४४-जी ३९४८ ची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात स्कूलबस चालक जनार्दन आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अपघातील मयत जनार्दन आंधळे हे तालुक्यातील झोला येथील असून जय भगवान महासंघ संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.