

चारठाणा : स्वातंत्र्याला ७० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी साध्या मूलभूत सोयींपासून वंचित असलेल्या सेलू तालुक्यातील बोथ आणि बोथ तांडा येथील ग्रामस्थांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. रस्ता आणि करपरा नदीवरील पुलाचा प्रश्न सुटत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर पूर्णतः बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचार वाहनाला किंवा पुढार्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
बोथ आणि बोथ तांडा येथील नागरिकांना गावाबाहेर पडण्यासाठी हक्काचा रस्ता नाही. करपरा नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. याबाबत जिल्हाधिकारी परभणी यांच्यापासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत वारंवार लेखी निवेदने देण्यात आली. सचिन राठोड व इतर ग्रामस्थांनी पाठपुरावा करूनही प्रशासनाने आणि राजकीय पुढाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
रस्ता नसल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक गर्भवती महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नदीला पूर आला की शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो किंवा शिक्षणापासून वंचित राहावे लागते. खराब रस्त्यांमुळे वृद्ध नागरिकांना दवाखान्यात नेणेही अशक्य झाले आहे. "आम्ही अनेकदा प्रशासनाचे उंबरठे झिजवले, पण आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. जोपर्यंत रस्ता आणि पुलाचे काम प्रत्यक्ष सुरू होत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाला गावात येऊ देणार नाही आणि मतदानही करणार नाही, असे मत बोथ-बोथ तांडा ग्रामस्थांनी मांडले आहे.
येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकही नागरिक मतदानाला उतरणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. गावात 'प्रचार बंदी'चे फलक लावण्यात आले असून राजकीय पक्षांच्या गाड्यांना प्रवेश नाकारला जात आहे. या निर्णयामुळे आता प्रशासनाचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या दोन्ही गानांकडे लागले आहे.