

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेल्या तुरीच्या ‘बीडीएनपीएच १८–०५’ या संकरित वाणास केंद्र शासनाकडून अधिकृत अधिसूचनेद्वारे मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांच्या माध्यमातून विकसित व शिफारस करण्यात आलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण ठरला असून, भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचना क्र. S.O. 6123(E), दिनांक ३१ डिसेंबर २०२५ अन्वये या वाणास “अधिसूचित वाण” म्हणून घोषित करण्यात आले आहे.
हा नवा वाण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांसाठी शिफारसीत करण्यात आला आहे. विशेषतः कोरडवाहू परिस्थितीत लागवडीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरणार असून, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवरही शाश्वत व स्थिर उत्पादन देण्याची क्षमता या वाणात असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा वाण मोठा दिलासा ठरेल, असे मत कृषि तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
या यशाबाबत बोलताना कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या कडधान्य उत्पादनवाढ मोहिमेत ‘बीडीएनपीएच १८–०५’ हा संकरित वाण महत्त्वाची भूमिका बजावेल. या वाणाच्या लागवडीमुळे कोरडवाहू तसेच बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांना स्थिर उत्पादन मिळेल आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीस मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शेतकरी देवो भव:” या भावनेतून विद्यापीठ सातत्याने संशोधन व विकासाचे कार्य करत असून, बदनापूर संशोधन केंद्राने यापूर्वीही तुरीच्या वाणांच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
कुलगुरूंनी यावेळी ‘गोदावरी’ या विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या वाणाचा उल्लेख करत सांगितले की, या वाणामुळे कोरडवाहू क्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल, तर ठिबक सिंचनाखाली जवळपास १८ क्विंटल उत्पादन मिळाल्याचे अनुभव शेतकऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाल्याने ‘गोदावरी’ वाण ऊसाला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्याच धर्तीवर ‘बीडीएनपीएच १८–०५’ हा संकरित वाणही तितकाच लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की, या संकरित वाणाच्या प्रसारामुळे तुरीच्या पिकाचे एकूण उत्पादन आणि उत्पादनातील स्थैर्य निश्चितच वाढेल. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठा हातभार लागणार आहे.
या वाणाच्या विकासात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचे कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी अभिनंदन केले. माननीय कुलगुरू, संशोधन संचालक, शिक्षण संचालक भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, माजी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर तसेच विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ. दीपक पाटील आणि शास्त्रज्ञ डॉ. विष्णू गीते यांनी या संशोधनात प्रमुख कार्य केले. त्यांना डॉ. किरण जाधव, डॉ. प्रशांत सोनटक्के, डॉ. पी. ए. पगार आणि डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी सहकार्य केले.
शेतकऱ्यांसाठी हा संकरित वाण लवकरच बियाण्यांच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संशोधन केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.