परभणी : आदिशक्तीचा जागर असलेल्या नऊ दिवसांच्या नवरात्रौत्सवाची सांगता शनिवारी (दि.१२) विजयादशमीस ठिकठिकाणी शस्त्रपूजन व सिमोल्लंघनाने मोठ्या उत्साहात झाली. शहरातील प्रमुख मंदिरांतून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
सायंकाळी शहराची वेस असलेल्या चारही भागांमध्ये सीमोल्लंघन करीत आपट्याच्या पानाच्या स्वरूपात परस्परांना सोने देत शुभेच्छा दिल्या. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सकाळी शहरातून पथसंचलन झाले. नवरात्रौत्सवानिमित्त प्रमुख देवी मंदिरांसह सार्वजनिक युवक मंडळांनी स्थापन केलेल्या नवरात्र दुर्गा महोत्सवात मागील नऊ दिवस भरगच्च कार्यक्रम, देखावे व दांडिया कार्यक्रम घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दांडियाच्या कार्यक्रमाचा आनंद महिला युवक, युवतींनी घेतला. विजयादशमीस या उत्सवाची सांगता विविध कार्यक्रमांनी झाली. अष्टभुजा देवी मंदिर येथे पहाटे ५ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
आशीर्वाद नगरातील दुर्गा देवी मंदिर, गवळी गल्लीतील तुळजाभवानी मंदिर यासह विविध देवी मंदिरात नवरात्रौत्सवाची कुलाचाराने सांगता झाली. सार्वजनिक नवरात्र महोत्सवांतूनही समारोपास अन्नदानाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले. विजयादशमीनिमित्त नागरिकांनी कपड्यांच्या खरेदी बाजारपेठेत गर्दी केली होती. याशिवाय पुजे व सजावटीसाठी लागणारी झेंडूची फुले, आपट्याची पाने व अन्य साहित्य साम्रगीसाठी मध्यवर्ती बाजारपेठेत मोठी गर्दी उलटली होती. सायंकाळी स्टेडियम मैदान, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, दत्तधाम परिसर व जिंतूर रोडवरील विसावा नाका परिसरात सिमोल्लंघन करीत परस्परांना सोने देत शुभेच्छा दिल्या.
श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त दररोज पहाटे काढलेल्या दुर्गामाता दौडचा समारोप विजयी दशमीस महादौडने झाला.अष्टभुजा देवी मंदिर येथून पहाटे ६ वाजता ही दौड काढण्यात आली, मध्यवर्ती भागातून पुन्हा अष्टभुजा देवी मंदिर येथे ती दाखल झाल्यानंतर महाआरतीने समारोप झाला. यानिमीत्त दौडमार्गावर विविध ठिकाणी शिवप्रतिष्ठाणने बॅनर लावले होते. तर रांगोळी व फुलांची आरास करून दौडचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक वैशभूषेत भगवे फेटे बांधून युवक-युवती सहभागी झाले होते.
विजया दशमीनिमित्त परंपरेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शहराच्या मध्यवर्ती भागातून पथसंचलन केले, संघाची स्थापना १९ वर्षांपूर्वी झालेली आहे. त्यामुळे संघ शतकात प्रवेश करीत असून संघाच्या सहा उत्सवांपैकी एक महत्त्वपूर्ण उत्सव असलेल्या विजयादशमीस पथसंचलन केले जाते. स्वयंसेवक गणवेशात या संचलनात सवाद्य सहभागी झाले होते, स्टेशन रोडवरील सिटी क्लब येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, कच्छी बाजार, विठ्ठल मंदिर, कोमटी गल्ली, क्रांती चौक, माळी गल्ली, नारायळ चाळ, पेढा हनुमान मंदिरमार्ग पुन्हा सिटी क्लब मैदानावर संचलनाची सांगता झाली, यानिमीत्त सेवा भारतीचे विभाग संयोजक धनंजय देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराज ग्रंथी सतनामसिंग टाक यांची प्रमुख उपस्थिती होती.