

पूर्णा : पिंपळा लोखंडे (ता.पूर्णा) येथे विद्युत तारेचा धक्का लागून वानराचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि .१) सायंकाळी ५ वाजता घडली. ग्रामस्थांनी विधीवत पूजा करुन वानरावर अंत्यसंस्कार केले. आतापर्यंत येथील ३३ केव्ही सबस्टेशन जवळील सिंगल फ्यूज विद्युत तारांचा स्पर्श होऊन ९ वानरे गतप्राण झाली आहेत. त्यामुळे महावितरणने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पिंपळा लोखंडे गावा शेजारील रस्ता किनारी महावितरण उपविभाग पूर्णा अंतर्गत ३३ के व्ही सबस्टेशन आहे. त्याच्या जवळच सिंगल फ्यूजचा डिपी आहे. त्या ठिकाणी जवळच असलेल्या लिंबाच्या झाडावरुन रोहित्रावर आज सायंकाळी ५ वाजता वानराने उडी मारली. विद्युतवहन चालू असल्यामुळे धक्का लागून वानर खाली कोसळून मृत्यू पावले. मृत वानरावर रामेश्वर लोखंडे, अंगद लोखंडे, प्रकाश लोखंडे, राजू नरवाडे, गोपीनाथ लोखंडे, माऊली लोखंडे, सुशांत लोखंडे, शेषराव लोखंडे, पवन लोखंडे यांनी विधीवत अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, या ठिकाणी ९ वानरांचा मृत्यू झाला आहे. डिपी रोडवर आणि झाडाला खेटूनच उभा केल्याने वानरे शॉक लागून ठार होत आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वानरांचा नाहक बळी जात आहे.