गंगाखेड : परळी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू असून या अर्धवट कामाचा फटका बुधवारी (दि.२३) पहाटे तीनच्या सुमारास अपघाताच्या स्वरूपात बसला आहे. गंगाखेडमार्गे परभणीला जाणारा छोटा हत्ती टेम्पो शहरातील तिरूपती पेट्रोल पंपाजवळ अधर्वट काम सुरू असलेल्या राष्ट्रीय महार्गावर आदळून झालेल्या अपघातात उत्तर प्रदेशातील तरूण व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पोतील दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मात्र टेम्पोचालक फरार झाला आहे.
मागील दोन वर्षांपासून परळी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथगतीने व तुकड्यातुकड्या टप्याटप्याने होत आहे. परभणी येथे सतरंजी विकण्याच्या व्यापाऱ्यानिमीत्त आलेले उत्तरप्रदेशातील दोघे तरूण मंगळवारी लातूर येथे टेम्पोचा (क्र.एचएच ०३ ए एच ८६५६) भाडेतत्तवावर माल खरेदीसाठी घेवून गेले होते.
रात्री उशिरा परतत असताना गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास गंगाखेड शहरातील तिरूपती पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट सुरू असलेल्या कामावर अचानक टेम्पो उलटला. यामध्ये मध्ये मुनासीर अली मुबारक अली (वय ४० रा. संभल, उ.प्र.) हा तरूण व्यापारी जागीच मृत्युमुखी पडला. त्याचा सहकारी सलमान हुसेन हा जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी फौजदार गिते यांनी भेट दिली असून पुढील तपास करीत आहेत.
परळी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून अतिशय संथ गतीने व टप्याटप्यात होत आहे. या महामार्गावर अपघातांचे प्रमाण मोठे आहे. तीन महिन्यांपूर्वी येथील रहिवासी व पालम ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. रमेश खंदारे यांची कारही पलटी होऊन डॉ. खंदारे गंभीर जखमी झाले होते. राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे व दुर्लक्षित धोरणामुळ लोकांना जीव गमवावे लागण्याची वेळ आली आहे.