

Purna Katneshwar village houses collapse
पूर्णा : तालुक्यातील कात्नेश्वर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कच्ची घरे कोसळली आहेत. जवळपास १० ते १२ नागरिकांची मातीची घरे ढासळल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. यावेळी सरपंच कान्होपात्रा चापके, उपसरपंच रामेश्वर चापके, ग्रामसेवक केशव जवंजाळ आणि मंडळ अधिकारी सुदाम खुणे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत.
पूर्णा तालुक्यातील इतर गावांतही अशाच प्रकारे कच्ची घरे कोसळत असून शेतकऱ्यांना शेतीबरोबरच आता घरांच्या नुकसानीचा धक्का बसला आहे. खरीप हंगाम आधीच वाया गेला असताना आता घरेही पडू लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. अशा बाधित शेतकरी व नागरिकांना तात्काळ शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
मागील पंधरा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम जवळपास पूर्णपणे वाया गेला असून उंचवट्यावरील सोयाबीन पीकही कापणीपूर्वीच झाडावर मोड फुटल्याने उत्पादन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यापुरते उत्पादन मिळणेही अशक्य झाले आहे.
सखल भागातील शेतांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन पीक काळसर होऊन पूर्णपणे निकामी झाले आहे. काही झाडांवर फक्त दोन-चार शेंगा तयार झाल्या आहेत, मात्र त्यातून उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. एका एकरातून पेरणीला लागणारे बियाणेसुद्धा परत येणार नाही, अशी परिस्थिती झाली आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर १३,५०० रुपये अनुदान मिळावे आणि ते विजयादशमीपर्यंत वितरित करावे, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. अतिवृष्टी, पूर आणि पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी वर्ग कर्जबाजारी होऊन गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.