

मानवत : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या अपघाताची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी (दि. 18) तालुक्यातील रूढी पती रोडवर कार व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना रात्री साडेसातच्या सुमारास घडली.
राहुल बाबू चव्हाण असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून दिनेश शंकर आडे आणि दत्ता बाबू चव्हाण हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेजण जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. मानवत रुढीमार्गे राहुल, दिनेश, दत्ता हे तिघे दुचाकी (एमएच २१ सीएफ ४९६३) परभणीकडे जात होते. तर कार (एमएच १४ जेई ५६४२) मानवत रोडकडून मानवतकडे येत होती.
दरम्यान, रुढी पाटीजवळ येताच दोन्ही वाहनांची मोठी धडक झाली. या धडकेत राहुल चव्हाण, दिनेश आडे, दत्ता चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल केले असता राहुल चव्हाण याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर दिनेश आणि दत्ता यांच्यावर परभणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडकेच्या तीव्रतेमुळे कारचे टायर फुटल्याने वाहन पुढे जाऊ शकले नाही. अखेर कारमधील महिला व चालक पुरुष कार सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.