

मानवत: मानवत नगरपालिकेच्या स्थायी समिती व विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडी शुक्रवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता पार पडल्या. या निवडीमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वरचष्मा राहिला असून विरोधक असलेले सेना भाजप युतीचे पाचही नगरसेवक अनुपस्थितीत राहिल्याने समिती सदस्यपदी देखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची वर्णी लागली.
येथील नगरपालिकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीत स्थायी समिती व विषय समिती सभापती व सदस्य यांच्या निवडी करण्यात आल्या.
स्थायी समितीचे अध्यक्षपद हे पदसिद्ध नगराध्यक्षासाठी असल्याने सभापतीपदी नगराध्यक्ष राणी लाड, नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध पद हे उपाध्यक्षकडे असल्याने या सभापतीपदी डॉ अंकुश लाड यांची तर सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी संजयकुमार बांगड, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी डॉक्टर देवयानी दहे, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी रेखा हालनोर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अनुराधा वासुंबे यांची बिनवीरोध निवड करण्यात आली.
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुशीला लाड, किशोर लाड, नंदिनी मोरे, नियामत खान, राजकुमार खरात, रूपाली उगले, भाग्यश्री शिंदे, मीरा लाड, द्वारका चौधरी, वृषाली रहाटे, ज्योती आळसपुरे तर शिवसेना (उबाठा) चे दीपक बारहाते, स्वीकृत सदस्य ऍड अनिरुद्ध पांडे व प्रकाश पोरवाल उपस्थित होते.
बैठकीस शिवसेनेचे गटनेते ऍड विक्रमसिंह दहे, विभा भदर्गे, शेख जवेरिया बेगम, मोहमद बिलाल बागवान व भाजपचे शैलेंद्र कत्रूवार हे 5 नगरसेवक अनुपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी पालिकेच्या सय्यद अन्वर, राजेश शर्मा, संजय रुद्रवार, पंकज पवार, बळीराम दहे व सय्यद जावेद या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.