

मानवत : तालुक्यातील रूढी शिवारातील छत्रपती पांडुरंग होंडे यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व्यक्तीने ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर तब्बल १६ तासांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी मानवत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास रूढी गावचे सरपंच मुसा रज्जाक कुरेशी यांना गावातील छत्रपती पांडुरंग होंडे यांनी दूरध्वनीवरून त्यांच्या गट क्रमांक १९२ मधील शेतातील विहिरीत एका अज्ञात व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सरपंच मुसा कुरेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मानवत पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचारी अतुल पंचांगे आणि खंडेराया राऊत घटनास्थळी दाखल झाले. मात्र संबंधित विहीर अत्यंत खोल असून त्यात सुमारे ५० फूट पाणी असल्याने अंधारात मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले नाही.
त्यानंतर शनिवारी (९ ऑगस्ट) सकाळी सात वाजल्यापासून रूढी गावातील युवक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शोधमोहीम सुरू केली. लोखंडी गजांना मोठे आकडे तयार करून विहिरीत मृतदेहाचा शोध घेण्यात आला. अखेर सकाळी सुमारे ९.४५ वाजता मृतदेह गजाच्या आकड्यात अडकून वर आणण्यात यश आले.हा मृत देह अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयाच्या पुरुषाचा असल्याचे कळले.
यानंतर मानवत पोलीस ठाण्याचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, शेख जावेद आणि खंडेराया राऊत यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मानवत ग्रामीण रुग्णालयात पाठविले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आदिल शेख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मानवत पोलिसांत सरपंच मुसा रज्जाक कुरेशी यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दिली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे तसेच मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
ग्रामस्थांचे कौतुक
विहिरीची खोली आणि पाण्याची पातळी अधिक असल्याने मृतदेह बाहेर काढणे मोठे आव्हान ठरले होते. मात्र रूढी गावातील युवक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शोधमोहीम राबविल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले. त्यांच्या या प्रयत्नांचे परिसरात कौतुक होत आहे.