.. अन्यथा निवडणुकीत सुपडासाफ करणार : मनोज जरांगे

 संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

मानवत : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ही जुनीच आहे. सध्या राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण समाजाला मान्य नाही. समाजाला केवळ ओबीसीतूनच आरक्षण द्यावे, अन्यथा येत्या लोकसभा निवडणुकीत सुपडासाफ केला जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथे दिला.

येत्या काही दिवसांत दीड हजार एकरवर मोठी सभा घेऊन मराठ्यांची ताकद दाखवून देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. रविवारी रात्री जरांगे यांची संवाद सभा झाली. मागील 75 वर्षांत राजकीय नेत्यांनी मराठा समाजाचा फक्त वापर केला, असा आरोप त्यांनी केला. समाजाने कोणत्याही नेत्यापुढे हात पसरू नयेत. 10 टक्के आरक्षण मान्य नाही. मराठ्यांना केवळ ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे.

'सगेसोयरे'बाबत सरकारने 2012 च्या कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर व मराठा समाज कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असले तरी आता माघार घेणार नाही. उपोषणादरम्यान चिडचिड होते तेव्हा काही बोललो असेल; परंतु सरकारने अंतरवालीत आंदोलनादरम्यान महिला, मुलींवर लाठीमार करून डोके फोडले, गोळ्या घातल्या. तेव्हा आई-बहिणी दिसल्या नाहीत का, असा सवाल मनोज जरांगे यांनी यावेळी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news