वीज जोडणीचा पत्ता नाही, पण १८ हजारांचे बिल हाती; महावितरणच्या 'भोंगळ' कारभाराचा शेतकऱ्याला झटका

Parbhani news |महावितरणने फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा काल्पनिक वीज वापर दाखवून १८ हजार १० रुपयांचे देयक शेतकऱ्याच्या माथी मारले आहे
Power Bill Defaulters
MahavitaranPudhari
Published on
Updated on

चारठाणा : नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक शुल्क भरून सहा वर्षे उलटली, तरी अद्याप वीज कनेक्शन मिळाले नाही. मात्र, दुसरीकडे वीज वितरण कंपनीने चक्क १८ हजार १० रुपयांचे बिल पाठवून शेतकऱ्याची क्रूर चेष्टा केली आहे. जिंतूर तालुक्यातील मोळा येथील शेतकरी प्रभाकर अंबादास पडघन महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे हवालदिल झाले असून, त्यांनी आता ग्राहक न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

शेतकरी प्रभाकर पडघन यांनी आपल्या गट क्रमांक ३८ मधील शेतात स्वतंत्र डीपी बसवण्यासाठी २२ डिसेंबर २०२० रोजी ९ हजार १० रुपयांचे कोटेशन भरले होते. रीतसर पैसे भरल्यानंतर तातडीने वीज जोडणी मिळणे अपेक्षित होते. मात्र, २०२६ उजाडले तरी महावितरणने त्यांना कनेक्शन दिले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या शेतात विजेची वायरही पोहोचली नाही, तिथे महावितरणने फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा काल्पनिक वीज वापर दाखवून १८ हजार १० रुपयांचे देयक शेतकऱ्याच्या माथी मारले आहे.

अधिकारी करतायत चालढकल

या प्रकारानंतर पडघन यांनी सेलू येथील कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन कागदपत्रे दाखवली. त्यांनी जिंतूर येथील उपकार्यकारी अभियंत्यांकडे जाण्यास सांगितले. जिंतूरच्या अभियंत्यांनी संबंधित सहाय्यक अभियंत्याला प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले. मात्र, या अधिकाऱ्याने शेतात जाऊनही पंचनामा केला नाही. "मला पंचनामा करण्याचे अधिकार नाहीत," असे सांगत शेतकऱ्याला पुन्हा कार्यालयाचे उंबरठे झिजवण्यास भाग पाडले.

शेतकऱ्याचा आक्रमक पवित्रा

महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकरी मानसिक आणि आर्थिक संकटात सापडला आहे. "सहा वर्षे होऊनही वीज नाही आणि न वापरलेल्या विजेचे अवाढव्य बिल देऊन माझी छळवणूक केली जात आहे," अशी भावना प्रभाकर पडघन यांनी व्यक्त केली. वारंवार विनंती करूनही दाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी या अन्यायाविरुद्ध जिल्हा ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news