

In Parbhani district, 531 candidates are in the election fray
परभणी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर परभणी जिल्ह्यातील राजकीय चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात उपलब्ध आकडेवारीनुसार प्रमुख तालुक्यांमध्ये मिळून एकूण ५३१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरी शमवण्यात पक्षांना यश आले असले तरी, पाथरी आणि सोनपेठ सारख्या ठिकाणी बहुरंगी लढतींमुळे चुरस निर्माण झाली आहे.
माघारीच्या प्रक्रियेनंतर परभणी तालुक्यात सर्वाधिक उमेदवार रिंगणात राहिले असून, सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर माघार झाल्याने तेथे लढती सरळ होणार आहेत.
जिंतूर आणि सेल : येथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ सामना पाहायला मिळेल.
गंगाखेड, मानवत आणि पालम : या तालुक्यांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी काटे की टक्कर होणार आहे.
परभणी : येथे मुख्य लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी असली तरी, काही ठिकाणी उबाठा सेनेने उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे.
पाथरी : येथे सर्वात गोंधळाची परिस्थिती असून काँग्रेस, शिंदे गट, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यात संमिश्र लढती होत आहेत.
पूर्णा : भाजपसमोर उबाठा सेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे कडवे आव्हान असेल.
सोनपेठ : येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि काँग्रेस असा तिहेरी सामना रंगणार आहे.