गंगाखेड : पुढारी वृत्तसेवा
मागील ४८ तासांपासून शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने अतिवृष्टी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीसह ग्रामीण भागातील नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील एकमेव धरण 'मासोळी'ची पाणीपातळी शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. कोद्री व तांदूळवाडी तलाव 'ओव्हर फ्लो' झाले, तर राणीसावरगाव, टाकळवाडी, नखतवाडी व पिंपळदरी तलावही पुर्णतः भरण्याच्या स्थितीत आहेत.
मागील ४८ तासांत मुसळधार पावसाच्या जोराने शहर आणि तालुका पूर्णतः ओलाचिंब झाला आहे. शहरातील गोदावरी नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून, छोटी-मोठी ऐतिहासिक मंदिरे पाण्याने वेढली जात आहेत. गोदाकाठच्या नागठाणा, मैराळ सावंगी, धारासूर, सावंगी, खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, रूमणा, जवळा, सायळा, मुळी, धारखेड, पिंपरी, झोला, मसला आदी भागात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
डोंगरपट्ट्यासह तालुक्याच्या सर्वच भागात मागील ४८ तासांत जोरदार पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरासह तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा मोठा आधार असलेल्या माखणी येथील मासोळी मध्य प्रकल्प शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. सद्यपरिस्थितीत मासोळीची पाणी पातळी ९५ टक्के इतकी आहे. तालुक्यातील कोद्री व तांदुळवाडी तलाव 'ओव्हर फ्लो' झाले आहेत. तर राणीसावरगाव, टाकळवाडी, नखतवाडी तलाव व पिंपळदरी साठवण तलाव अवघ्या दोन दिवसांत पूर्णतः भरण्याच्या स्थितीत आहेत.