

Guardian Minister Bordikar threatens village servant, video goes viral on social media
परभणी, पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा एकदा वादाच्या जिंतूर केंद्रस्थानी आल्या. तालुक्यातील बोरी येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी एका ग्रामविकास अधिकाऱ्याला जाहीर सभेत कानाखाली मारण्याची आणि तात्काळ बडतर्फ करण्याची धमकी दिली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पहावयास मिळत आहे.
बोरी येथील सभे दरम्यान घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना लाभार्थ्यांच्या सभेतच तक्रारी आल्यानंतर पालकमंत्री बोर्डीकर चिडल्या आणि ग्रामसेवकास याद राख, ही मेघना बोर्डीकर आहे. तुला पगार कोण देतो? कुणाचीही चमचेगिरी चालणार नाही. असे म्हणत कानाखाली वाजवीन, आत्ताच्या आत्ता बडतर्फ करीन अशा शब्दांत सुनावले.
या प्रकरणाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवर पोस्ट करत सत्त-राधाऱ्यांवर टीका केली.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे स्पष्टीकरण
बोरीतील घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पालक मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा ग्रामसेवक विधवा महिलांना पैशासाठी त्रास देत होता आणि एका स्थानिक नेत्याकडे पाठवून त्यांचं शोषण करत होता.
मग अशा लोकांची पूजा करायची का? माझा तो त्रागा होता. त्यांनी रोहित पवार यांच्यावरच पलटवार करत, पोलीस अधिकाऱ्याला धमकावणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला लगावला.