

Give 5th grade student for 8th grade admission.
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरा लासीना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पिंपळा लोखंडे येथील श्री तुळजाभवानी विद्यालय या खाजगी शाळेत आठवीत प्रवेश घेण्यासाठी जावे लागते. मात्र या शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अजब अट घालून गावात प्रचंड संताप निर्माण केला आहे. तुम्हाला आठवीत प्रवेश हवा असेल तर तुमच्या गावातील जि.प. शाळेतून पाचवीचा विद्यार्थी आमच्याकडे प्रवेशासाठी आणा अशी अट त्या खाजगी शाळेने घातल्याने पालकांवर नाहक दबाव येत आहे.
सदरील खाजगी शाळेने घातलेल्या या अजब अटीमुळे पांगरा येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीतील विद्यार्थी संख्या कमी होत असून या शाळेवर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. संबंधित खाजगी शाळेच्या अजब फतव्यामुळे जिल्हा परिषदेची शाळा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ही बाब चिंताजनक बनणार आहे. जिल्हा परिषद शाळेतून सातवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नियमितपणे पुढील शिक्षणासाठी आठवीत जात असताना त्यांच्यासमोर अनाधिकृत आणि अन्यायकारक अटी मांडल्या जात आहेत.
शिक्षण विभागाच्या कोणत्याही नियमात अशा प्रकारची अट असल्याचे पहावयास मिळत नसल्याने पालकांतून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाने तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे. सरकारी शाळेचे अस्तित्व टिकविण्यासाठी, अशा अटी घालणाऱ्या खाजगी शाळांवर निर्बंध आणणे ही काळाची गरज बनली आहे.
सदर प्रकार उघडकीस आला असताना आम्ही गावातील जि. प. प्राथमिक शाळेत जाऊन पाचवीच्या विद्यार्थ्यांची टीसी देऊ नका अशी शिक्षकांना विनंती केली. परंतु पिंपळा येथील खासगी शाळेतील शिक्षकांच्या विनापरवाना फतव्याला बळी पडून पालक टीसी द्या म्हणून विनंती करीत आहेत. यावर काय निर्णय घ्यायचा हेच समजत नाही असे शिक्षक सांगत आहेत. आठवीत प्रवेश देण्यासाठी पाचवीचा विद्यार्थी कशाला पाहिजे? हा शिक्षण खात्याचा नियम आहे का? हा प्रकार शिक्षण विभागाने त्वरित थांबवावा अशी प्रतिक्रिया पांगरा येथील ग्रा.पं. सदस्य जगदीश ढोणे यांनी दिली आहे.
आमच्या गावातील जि.प.शाळा अनेकवेळा स्वखर्चातून विविध शैक्षणिक साहित्य देऊन सुध-ारण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच आमच्या शाळेतून ७ वी पास विद्यार्थी हे आठवीत प्रवेश घेण्यासाठी पिंपळा येथील खासगी शाळेत गेले असता त्यांना त्याच्या बदल्यात पाचवीचा विद्यार्थी आणा असे तेथील शिक्षक सक्ती लावत आहेत. त्यांना हा अधिकार कोणी दिला? याकडे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून यावर बंधन घालावे अशी अपेक्षा शालेय समिती अध्यक्ष रमेश ढोणे यांनी व्यक्त केली.