Parbhani Political news: गंगाखेडचे राजकीय समीकरण बदलणार? ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'या' मोठ्या नेत्याचे पक्षांतर

गुट्टे समर्थक थेट कमळावर निवडणूक लढणार; भाजपात खळबळ, विटेकर अडचणीत
BJP strong performance Thane
BJPPudhari
Published on
Updated on

गंगाखेड : गंगाखेड विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अक्षरशः हादरून गेले असून, एकामागून एक राजकीय भूकंप घडत आहेत. भाजप आणि आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे हाडवैर सर्वश्रुत असतानाच, आमदार गुट्टे यांचे समर्थक उमेदवार थेट भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने संपूर्ण मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर आणि आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यातील घरोबा उघडपणे चर्चेत होता. जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक गंगाखेड विधानसभे मधील दोघे मिळून लढवणार, अशी स्पष्ट चर्चा होती. गटांचे वाटप, उमेदवारांची नावे, पक्षप्रवेश यापर्यंत हालचाली सुरू झाल्या होत्या. काही उमेदवारांना तर “कामाला लागा” असे आदेशही देण्यात आले होते.मात्र, ऐनवेळी गंगाखेडच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली.

विधानसभा व नगरपरिषद निवडणुकीत भाजप व आमदार गुट्टे यांचे सूर जुळले नव्हते, हे जरी खरे असले तरी, राष्ट्रवादीसोबतची जवळीक अचानक संपुष्टात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार विटेकर यांनी “दोघांच्या मर्जीतील उमेदवार असतील” असे संकेत देत गटांतील उमेदवार जवळपास निश्चित केले होते. मात्र, आता बदललेल्या समीकरणांमुळे विटेकर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दुसरीकडे, भाजपच्या गोटातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील इसाद, महातपुरी व कोद्री या तीन जिल्हा परिषद गटांमध्ये आमदार गुट्टे समर्थकांना थेट कमळ चिन्हावर लढण्याची संधी मिळाल्याचे समजते. याच धर्तीवर पालम व पूर्णा तालुक्यातही जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.

या घडामोडींमुळे भाजपच्या पारंपरिक इच्छुक उमेदवारांचा मात्र तीव्र हिरमोड झाला आहे. अनेक ठिकाणी “आम्ही काम करायचे आणि तिकीट दुसऱ्यालाच” अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. परिणामी, भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक होण्याची दाट शक्यता असून, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासमोर कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.एकूणच, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक आता केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, प्रतिष्ठेची, वर्चस्वाची आणि राजकीय ताकद दाखवण्याची लढाई ठरत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट दिसून येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news