

गंगाखेड : गंगाखेड शहरातील एका पुजाऱ्याच्या घरी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावण्यात गंगाखेड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला निष्पन्न करत त्याच्याकडून चोरीला गेलेला सुमारे ९२ हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा ऐवज फिर्यादीस परत करण्यात आला असून, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गंगाखेड येथील देवळे गल्लीत राहणारे पुजारी श्रीधर विश्वनाथ धर्मापुरीकर (वय ५५) यांच्या घरी १० मार्च २०२५ रोजी घरफोडीची घटना घडली होती. या घटनेत त्यांचे सुमारे एक तोळा सोने चोरीला गेले होते. याप्रकरणी धर्मापुरीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण होते.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार किशोर गुडेटवार आणि त्यांच्या पथकाने सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक साधनांचा वापर करत आणि गोपनीय माहितीच्या आधारे अथक परिश्रम घेऊन आरोपीचा शोध लावला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
३० जुलै रोजी, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, जप्त केलेला सोन्याचा ऐवज पंचनामा करून फिर्यादी श्रीधर धर्मापुरीकर यांना परत करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, तपास अधिकारी किशोर गुडेटवार आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आपला चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने धर्मापुरीकर यांनी पोलिसांचे आभार मानले. या जलद कारवाईमुळे नागरिकांमधून गंगाखेड पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.