

गंगाखेड : गंगाखेड नगरपरिषदेची अत्यंत अटीतटीची व चुरशीची ठरलेली नगराध्यक्षपदाची निवडणूक अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उर्मिला मधुसूदन केंद्रे यांनी जिंकली. या विजयासह माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी आपले पुन्हा वर्चस्व सिद्ध केले.
रविवारी (दि. २१) मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. १३ टेबलवर ४ फेऱ्यांत मतमोजणी पार पडून दुपारी १ वाजता निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर होताच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गंगाखेड येथे हजेरी लावत विजयी जल्लोषात सहभाग नोंदवला. खासदार संजय जाधव व माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवत प्रभावी रणनीतीने विजय मिळवला.
नगरसेवक संख्येत शहर विकास आघाडी (यशवंत सेना) यांनी बाजी मारत बहुमत मिळवले असले, तरी नगराध्यक्षपदावर त्यांना हार मानावी लागली. भाजपाच्या जयश्री रामप्रभू मुंडे तसेच काँग्रेसच्या उजमामाईन शेख (युनूस नेते) यांना पडलेल्या मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत काही प्रभागांत माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली, तर काही ठिकाणी नवख्या उमेदवारांनी बाजी मारली. अनेक मातब्बर नेत्यांना मात्र मतदारांनी घरी बसवले असून, गंगाखेड नगरपरिषद निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
उर्मिला मधुसूदन केंद्रे : १०,०५४ मते (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) विजयी
निर्मलादेवी गोपालदास तापडिया : ९,३७६ मते (शहर विकास आघाडी)
उजमामाईन समीर शेख (युनूस नेते) : ६,२४२ (काँग्रेस)
जयश्री रामप्रभू मुंडे : ६,२२१ मते (भाजप)
गिरी कमलाबाई काशीगीर : २५९ मते
नोटा : २०५ मते
यशवंत सेना (शहर विकास आघाडी) : १५
राष्ट्रवादी काँग्रेस : ७
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) : ३
भाजप : १