

Urban Local Body Elections
गंगाखेड: गंगाखेड नगरपरिषद निवडणुकीत खरी चुरस लागली आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी स्वतंत्र उमेदवार जाहीर केल्यामुळे वातावरण तापले आहे. यावर स्थानिक आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या शहर विकास आघाडीचा प्रवेश आणि विरोधात काँग्रेसचा एकमेव उमेदवार अशा समीकरणामुळे गंगाखेडमध्ये पंचरंगी लढत होणार आहे.
उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने अचानक उमेदवार जाहीर करून भाजपा आणि शहर विकास आघाडीची डोकेदुखी वाढवली. राज्यात विरोधात असलेला शिवसेना (उद्धव ठाकरे) गट आणि सत्तेत असलेला राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांनी गंगाखेडमध्ये अनोखी युती केली आहे. माजी आमदार डॉ. केंद्रे यांच्या पत्नी उर्मिला केंद्रे यांना उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाल्यामुळे ही लढत चुरशीची झाली आहे.
यात माजी मंत्री धनंजय मुंडे स्वतः मैदानात उतरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले, तर माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत शहरवासीयांचे लक्ष वेधले. भाजपा नेते रामप्रभू मुंडे यांनी महायुतीला टाळत पत्नी जयश्री मुंडे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली. “एकला चलो” या घोषवाक्याखाली त्यांनी विकासाच्या कामगिरीवर उमेदवारी दाखल केली.
गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी शहर विकास आघाडीमार्फत विविध पक्षांच्या असंतुष्टांना एकत्र आणून निर्मलादेवी तापडिया यांची उमेदवारी जाहीर केली. अर्ज दाखल करताना त्यांनी मोठा रोड शो काढून शक्ती प्रदर्शन केले. राज्यात व केंद्रात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सहकार्याने नगराध्यक्ष पदासाठी उजमा माईन शेख यांना उमेदवारी दिली.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज (दि.17) नगराध्यक्ष पदासाठी एकूण 11 अर्ज तर 26 नगरसेवक पदांसाठी 72 अर्ज दाखल झाले आहेत. नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे संपूर्ण गंगाखेडकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.