Parbhani News | खोटे खरेदी खत देणाऱ्यांना न्यायालयाचा झटका
मानवत : महामार्गालगत जमीन नसतानाही खोटे खरेदी खत देऊन फसवणूक केल्याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा आदेश मानवत न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.
तक्रारदार नागनाथ कचरू जंगाले यांनी ॲड. सुनील जाधव यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये बाळासाहेब दत्तात्रय देशमुख यांनी त्यांची स्वतःची जमीन ही हायवेलगत नसताना सुद्धा साजिद अली मोहम्मद ताहेर अन्सारी आणि साजिद अली अब्दुल सलाम बेलदार यांना शेत गट नंबर ५० मौजे खरबा येथील जमीनीचे खोटे व बनावट खरेदी खत करून दिले. त्यामध्ये साक्षीदार म्हणून गोपाळ नारायण भिसे, मुस्तफा दादामियाँ शेख, ज्ञानोबा लक्ष्मण कच्छवे यांनी सही केली. या सर्वांनी जमीन हायवेलगत नसताना खोटे खरेदी खत करून दिल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार फिर्यादी नागनाथ कचरू जंगाले यांनी मानवत न्यायालयात केली.
गुन्हा नोंद करण्याचा न्यायालयाचा आदेश
मानवत रेल्वे स्टेशनचा उड्डाण पूल झाल्यानंतर शासनाने अधिग्रहण केलेला पुरावा व बाळासाहेब देशमुख व त्यांची आईची जमीन हायवे लगत नसताना जाणूनबुजून खोटे खरेदी खत करून दिले, असा युक्तिवाद ग्राह्य धरुन मानवत न्यायालयाने दि. ६ रोजी मानवत पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला.

