पूर्णा : पुढारी वृत्तसेवा
येथील तहसिल कार्यालयातील महसुल पथकाने ता.२८ सप्टेंबर (शनिवार) रोजी सकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास पांगरा रोडवर असलेल्या (आडगाव शिवार गट क्र ११० मधील) तथा दमरेच्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यासाठी गॅलकॉन ईन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या व्यवस्थापकांनी विनापरवाना बेकायदेशीर सुमारे ४५० ब्रास केलेला अवैध रेतीसाठा तहसिलदार माधवराव बोथीकर, तलाठी गणेश गोरे, सिध्दोधन खिल्लारे, कोतवाल मुरलीधर मोरे, गाडी चालक गौतम घाटे यांच्या पथकाने छापा टाकून पंचनामा करुन जप्त केला.
दरम्यान, पूर्णा शहरातील अकोला - पूर्णा, पूर्णा-नांदेड या दोन्ही रेल्वे लोहमार्गावर दमरेच्या महारेल खात्याअंतर्गत रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम चालू आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम हे सध्या गॅलकॉन ईन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करीत आहे. त्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकांनी महसूलच्या गौणखनिज कायद्याला तिलांजली देत विनापरवाना रेतीसाठा केल्याची गुप्त माहिती तहसील मधील महसुल प्रशासनास मिळाली होती, त्यावरुन तहसिलदार बोथीकर यांनी सदर अवैध रेतीसाठ्याची पाहणी केली असता, कंपनीच्या व्यवस्थापकाकडे रेतीसाठ्याबाबत कुठलाही परवाना, रायल्टीच्या पावत्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे या अवैध ४५० ब्रास तिन ते साडेतीन लाख रुपये किंमतीचा रेतीसाठा ढिगारा जप्त करण्यात आला. सबंधीत कंपनीला योग्य तो दंड ठोठावण्यात येणार असल्याचे महसुल पथकाने सांगितले आहे.