

परभणी : पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे खरीप हंगामातील सोयाबीन पिक कापणी व सुकवणी प्रयोगादरम्यान विमा कंपनीकडून वापरण्यात आलेला वजन काटा दोषयुक्त आढळल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी पालम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
वजन मोजणीतील फरक उघडकीस सोमवारी (दि. १३) सायंकाळी ६.३० वाजता खरब धानोरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात पिक कापणी प्रयोग पार पडला. यावेळी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडचे प्रतिनिधी अनिकेत शेरे (रा. नालंदा नगर, नांदेड) व नितीन भालेराव (रा. पंचशील नगर, परभणी) उपस्थित होते.
कंपनीने प्रयोगानंतर दिलेल्या वजन काट्यावर सोयाबीनचे वजन ५.००६ किलो दाखवले. मात्र ग्रामस्थरीय विमा समितीचे सदस्य भास्कर बालासाहेब कऱ्हाळे यांनी वजनावर शंका घेतल्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी अच्युत भालेराव यांच्या माध्यमातून गावातील किराणा दुकानदाराचा काटा आणून पुन्हा मोजणी केली. या वेळी वजन ३.०२९ किलो नॉदले गेले. त्यामुळे वजनात १.९७७किलोचा फरक समोर आला. या गंभीर घटनेची दखल घेत तालुका तहसीलदार श्रृंगारे, गटविकास अधिकारी शिसोदे आणि तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी प्रत्यक्ष प्रयोगस्थळी तपासणी केली. वजन व माप निरीक्षक संजय धुमाळे यांच्याकडे तांत्रिक तपासणीसाठी आदेश देण्यात आले.
अहवालानुसार, कंपनीचा वजन काटा दोषयुक्त असून प्रयोगात वापरण्यात आलेले वजन नियमावलीला अनुरूप नाही आणि फसवणूक करणारे आहे, असे स्पष्ट झाले, मापक मानक शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण प्रकारामुळे शेतकऱ्यांना कमी उत्पादन दाखवून विमा नाकारण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थरीय समितीच्या सतर्कतेमुळे आणि तालुका अधिकाऱ्यांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे मोठी फसवणूक टळली. तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी पालम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, विमा कंपनी व तिच्या प्रतिनिधींवर फसवणूक, बनावट साधन वापरणे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल या गुन्ह्यांची नोंद घेऊन योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विमा कंपनीच्या वजन काट्यातील गैरप्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. शेतकरी संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे हक्क डावलणाऱ्या कंपन्यांना वेळेत दंड देणे गरजेचे असल्याचे सर्वत्र सांगितले जात आहे.