

Efforts for Pune, Nagpur, Patna special train for Dussehra-Diwali rush
परभणी, पुढारी वृत्तसेवा : दसरा, दीपावली आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुणे, नागपूर आणि पाटणा मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच नांदेड-पाटणा आणि नांदेड-सावंतवाडी या मार्गांवरही विशेष रेल्वे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सिकंदराबाद येथील प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक (PCCM) इती पांडे यांनी दिली.
यासंदर्भात दि. ३० सप्टेंबर रोजी मराठवाडा रेल्वे प्रवासी असोसिएशनच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. दसरा, दीपावली आणि छटपूजेच्या काळात मराठवाड्यातून मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेड-सावंतवाडी (पुणे व मनमाड मार्गे), संभाजीनगर-नागपूर आणि नांदेड-बिकानेर दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय पुणे मार्गावरून नांदेड/हिंगोली-कल्याण दरम्यान नवीन रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली. जालना-यलहंका विशेष रेल्वेला दोन्ही बाजूंनी विस्तार देऊन ती संभाजीनगर-म्हैसूर दरम्यान कायमस्वरूपी चालविण्यात यावी. तसेच बेंगळुरू-नांदेड दैनंदिन रेल्वेचा नागपूरपर्यंत विस्तार करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यात आली.
कोल्हापूर-नागपूर आणि अमरावती-पुणे रेल्वेच्या वेळापत्रकातील लूज टाइम कमी करून या गाड्या दररोज चालवाव्यात, यासह मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसंदर्भात अतिरिक्त मुख्य परिचालन व्यवस्थापक विशाल अर्जुन, अतिरिक्त परिचालन प्रबंधक विवेकानंद यल्लप्पा आणि अतिरिक्त कोच प्रबंधक रायडू यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी मराठवाड्यातील रेल्वेसेवा, नवीन गाड्या, विशेष रेल्वे तसेच विविध मार्गांच्या विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, देशभरातील विविध रेल्वे विभागांकडून दसरा आणि दीपावलीच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे जाहीर करण्यात येत आहेत. त्यामुळे मराठवाड्यासाठीही विशेष रेल्वेची तत्काळ घोषणा करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागण्यांसाठी अरुण मेघराज, राजेंद्र मुंढे, प्रा. सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालानी, दयानंद दीक्षित, खदीर लाला हाश्मी, माणिकराव शिंदे, रुस्तम कदम, रवींद्र बोरूळकर, प्रवीण थानवी आदींनी पाठपुरावा केला आहे.
सणासुदीच्या काळात विशेष रेल्वेची गरज
दसरा, दीपावली आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून परराज्यात तसेच राज्यातील विविध शहरांकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नांदेड-पाटणा, नांदेड-सावंतवाडी, संभाजीनगर-नागपूर, नांदेड-बिकानेर यांसह पुणे, नागपूर व पाटणा मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्याची तातडीची गरज आहे; त्याचबरोबर नांदेड-हिंगोली-कल्याण नवीन रेल्वे, बेंगळुरू-नांदेड रेल्वेचा नागपूरपर्यंत विस्तार आणि जालना-यलहंका रेल्वेचा संभाजीनगर-म्हैसूरपर्यंत विस्तार झाल्यास सणासुदीच्या काळातील प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.