

MSRTC student fare discount
जिंतूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) तर्फे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सवलत क्रमांक ४ अंतर्गत विशेष सवलत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात आपल्या पालकांना भेटण्यासाठी मूळ गावी प्रवास करताना एसटी तिकीट दरात तब्बल ५० टक्के सवलत दिली जात आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी दिली.
जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक चव्हाण यांनी केले.
या सवलत योजनेबाबत शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून आगार व्यवस्थापक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेचे निकष यांची माहिती सविस्तरपणे दिली.
चव्हाण म्हणाले, “एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी दिलेली ही सवलत केवळ आर्थिक बचत घडवून आणणार नाही, तर विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबीयांशी सुट्टीत वेळ घालवण्याची संधीही मिळवून देईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ५० टक्के सवलतीचा अवश्य लाभ घ्यावा.”