

गंगाखेडः परभणी लातूर बस मध्ये दोन प्रवाशांत जागेवरुन बाचा-बाची सुरू होती. याचे पर्यवसन एसटी बस फोडण्यात झाली. ही बस परळी नाक्यावर आली असता त्यातील एका प्रवाशाने फोनवरून नातेवाईकांना बोलवून घेतले. या नातेवाईकांनी बसची तोडफोड करून नुकसान केले. या बाबत अज्ञांताविरोधात 27 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की 27 डिसेंबर शुक्रवारी संध्याकाळी 7:20 वा परभणी लातूर ( बस क्र एम एच 24 ए यु 7720) लातूर आगाराची बस गंगाखेड येथील परळी नाक्यावर आली असता रस्त्यामध्येच दोन प्रवाशात जागेवर बसण्यावरून वाद चालू होता. त्यातील एका प्रवाशाने गंगाखेड येथील नातेवाईकांना बोलावून घेतले त्यांनी बस थांबताच बस मध्ये 6 ते 7 जणांनी बळजबरी घुसण्याचा प्रयत्न करत बसची मोडतोड केली.
यात दरवाजाच्या काचा फोडल्या. हा प्रकार चालू असताना शूटिंग करण्याचा प्रयत्न वाहक यांनी केला होता परंतु मोबाईल हिसकावून घेत व्हिडिओ डिलीट केला. वाहक व चालक यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता. यात न पडण्याचा इशारा देऊन प्रवासी केशव बाबुराव गीते राहणार परळी यांना मारहाण केली. याबाबत कोणीतरी पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस घटनास्थळी आले होते. बसचे अंदाजे पाच हजार रुपये नुकसान केले आहे. बसचे वाहक महेशकुमार बालाजी बिडवे राहणार लातूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात सहा ते सात जणाविरुद्ध गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.