

Suresh Bandgar protest attempt
गंगाखेड : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गंगाखेड येथे आज (दि. १) रास्ता रोको आंदोलन झाले. आंदोलनादरम्यान नाट्यमय वळण घेत तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महाराणा प्रताप चौकात सुरू असलेल्या या रास्ता रोकोमध्ये धनगर समाज नेते सुरेश बंडगर यांनी आक्रमक भाषण करत शासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. अंमलबजावणी करतो म्हणून तुम्ही सत्तेत आहात, धनगर समाजाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यानंतर त्यांनी अचानक पेट्रोलने भरलेला कॅन अंगावर ओतत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
यामुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळ व तणावाचे वातावरण पसरले. मात्र पोलिस व इतर कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करून त्यांना थांबवले आणि मोठा अनर्थ टळला. या प्रकारानंतर घोषणाबाजी अधिक तीव्र झाली.बंडगर यांना आंदोलन स्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले होते.
सुरेश बंडगर यांनी यापूर्वीही २०२३ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे याच मागणीसाठी अकरा दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी शासनाने "आरक्षणाची अंमलबजावणी लवकरच होईल" असे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन पूर्ण झाले नाही, यामुळेच रोषाने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.